इतिहासाचे एक पान. २१२

कन्नमवार यांचं पत्र मिळतांच यशवंतरावांनी त्यांना घरीं बोलावलं आणि आपल्याहि भूमिकेचा खुलासा केला. यशवंतरावांच्या मनांत त्यांच्याविषयी शंका नव्हतीच. तेंच त्यांनी बोलून दाखवलं; आणि कुणी कांहीहि म्हणोत, आपल्या कार्यपद्धतीवर माझा दृढ विश्वास आहे, असं सांगून कन्नमवारांना त्यांनी शंका-मुक्त केलं. यशवंतरावांनी हा आपला दृष्टिकोन पुढे कायम ठेवला आणि चंदीगडच्या काँग्रेस-अधिवेशनांत कांही महाराष्ट्रीय मंडळींनी कन्नमवार यांच्याविषयी संशय व्यक्त करतांच त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊं नका, असंच यशवंतरावांनी सांगितलं.

परस्परांमधील प्रेमांत आणि संबंधांत कसल्याहि प्रकारची कटुता निर्माण होणार नाही याबद्दल यशवंतराव नेहमीच दक्ष रहात असत. त्यांचा तो स्वभावच बनला होता. वाटाघाटीनं, धिमेपणानं, प्रेमाच्या संबंधांत बिघाड येऊं न देतां एखादा वादग्रस्त प्रश्न सोडवणं महाकठीण असतं. सर्व सत्ता हातीं असलेला माणूस तर ‘एक घाव दोन तुकडे’ करण्यांतच पुरुषार्थ मानत असतो. तसं करणं त्याला सोपं असतं. यशवंतरावांच्या हातांत सर्व सत्ता होती, राजकीय क्षेत्रांत कुशलतेनं शस्त्रक्रिया करण्यांत ते निष्णात होते, पण द्वैभाषिकाच्या सबंध काळांत त्यांनी ज्या शस्त्रक्रिया केल्या त्या कौशल्यपूर्ण ठरल्या.

प्रचंड मानसिक ताण मात्र त्यांना या काळांत सहन करावा लागला. महाराष्ट्र राज्य-निर्मितीच्या या वेदना प्राण कंठाशीं आणणा-या होत्या. कांही गोष्टी मनाप्रमाणे होत नव्हत्या, पण त्यासाठी भांडणं टाळावीं लागत होतीं. कित्येकदा हातातोंडाशीं आलेला घास निसटून जातो की काय, अशीहि परिस्थिति निर्माण होत असे. विघ्नसंतोषी मंडळी टपलेलीच होती. मतभेद निर्माण करायचे आणि त्या खडकावर चर्चेचं तारूं आदळून फुटावं असे त्यांचे प्रयत्न होते. विभाजनांत असा व्यत्यय निर्माण करून १९६२ पर्यंत तें लांबवावं व १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकी झाल्यावरच त्याचा विचार करावा अशी इच्छा करणारी मंडळी आसपास वावरत होती; परंतु यशवंतरावांनी जी नीति अवलंबली त्यामुळे त्या इच्छुकांना संधीच मिळूं शकली नाही. सा-या वाटाघाटी त्यांनी अखेरपर्यंत यशस्वी केल्या आणि ऐनजिनसी यश हस्तगत केलं. महाराष्ट्रांतली काँग्रेस-संघटना आणि प्रशासकीय कारभार या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी हें यश संपादन केलं. मुख्यमंत्रिपदाचा काटेरी मुगुट स्वीकारल्यापासून सह्याद्रीची मुत्सद्देगिरी आणि समर्थांची उक्ति अंतःकरणांत बाळगूनच त्यांचा सगळा प्रवास झाला.

फड नासोंचि नेदावा l पडिला प्रसंग सावरावा l
अतिवाद न करावा l कोणी एकासी ll

हें समर्थ-सूत्र धरूनच ते महाराष्ट्राच्या निर्मितीच्या क्षणापर्यंत पोंचले. १९६० च्या एप्रिलअखेरीस शिवनेरीवरील सोहळा आणि मुंबईंत प्रत्यक्ष नवराज्य-निर्मिति हे यशवंतरावांच्या राजकीय जीवनांतले अमृतमय, अमर असे परम भाग्याचे क्षण आहेत. महाराष्ट्रांतल्या तमाम जनतेकडून आणि भारतीय श्रेष्ठ नेत्यांकडून नेतृत्वाचं प्रशस्तिपत्र याच वेळीं त्यांना मिळून गेलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org