यशवंता टिळक हायस्कूलमध्ये दाखल झाला त्याच वेळीं मधला भाऊ गणपत हाहि हायस्कूलमध्ये शिकत होता. ज्ञानोबा नोकरींत रूजूं झाला होता. गरिबी चोहो बाजूनं वेढलेलीच होती. शाळेची फी त्या काळांत जुजबी होती, पण एक तांबड्या पैशाला किंमत असलेला तो काळ. पांढऱपेशा, श्रीमंत वर्गांतल्या मुलांच्यापुढे शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न नसायचा. परंतु या दोघा भावांना महिन्याची शाळेची जुजबी फी देण्यासाठीहि घरांत पैसा शिल्लक रहात नव्हता. गरिबांच्या मुलांनी गुरं राखावींत, शेणगोठा करावा, शेतीची राखण करावी अशीच सुखवस्तु समजल्या जाणा-या वर्गाची धारणा असे. या मुलांच्या कष्टाच्या बदल्यंत उरलेलं शिळं अन्न त्यांना देण्याचा मोठेपणा ते दाखवीत. हेटाळणी ही तर गरिबांच्या मुलांना ऐकावी लागेच. गरिबाचा कुणी मुलगा शिकत असला तर त्याला फीसाठी जुजबी मदत करण्याचे तर राहोच, नादारीसाठी एखाद्यानं समाजांतल्या प्रतिष्ठिताला गरिबीचं शिफारसपत्र मागितलं तरी त्याची बोळवण हेटाळीनंच होत असे.
टिळक हायस्कूलमध्ये शिकणारा यशवंताहि या प्रकारच्या हेटाळणींतून सुटला नाही. त्या काळांत शाळेंत नादारी मिळवायची तर एखाद्या प्रतिष्ठितांकडून विद्यार्थी गरीब असल्याबद्दलचं शिफारसपत्र घ्यावं लागे. शाळांचा तसा नियम असायचा. गावांतल्या एका घरंदाज श्रीमंताकडे विद्यार्थी यशवंता असाच एक दिवस शिफारसपत्राची मागणी करण्यासाठी गेला. चव्हाण-कुटुंब हें गरिबींत दिवस घालवीत आहे हें त्या प्रतिष्ठिताला माहीत होतं. परंतु गरिबीचं शिफारसपत्र देण्याचं तर त्यांनी नाकारलंच शिवाय तुच्छतेचे शब्दहि ऐकविले. एक लहानशी घटना, परंतु या घटनेनं विद्यार्थी यशवंताचा स्वाभिमान दुखावला गेला होता. गरिबांना स्वाभिमान नसतो अशीच त्या प्रतिष्ठित गृहस्थांची भावना असावी. यशवंताला दु:ख होतं ते शिफारसपत्र मिळालं नाही यापेक्षाहि त्या तुच्छ शब्दांचं ! यशवंताच्या मनाला ही घटना बोचली. परंतु हें शल्य या विद्यार्थ्यानं मनाच्या एका कोप-यांत ठेवलं आणि तो तिथून चालता झाला. मनांत प्रतिज्ञा मात्र केली की, अत:पर शिक्षणाच्या मदतीसाठी कुणा थोरामोठ्यांची याचना करायची नाही, असेल त्या आणि जमेल त्या परिस्थितींतच शिक्षण चालू ठेवायचं. भाऊबंद होते, पण ते कडेला उभे राहून पहात होते. पुढच्या काळांत, महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळीं सुद्धा, कुणाकडे याचना करायची नाही अशी प्रतिज्ञा त्यानं कटाक्षानं पाळली ; परंतु मित्र मदतीसाठी तयार होते. यशवंतानं शिकावं अशी कांही मित्रांची इच्छा होतीच. त्यांतल्या सुखवस्तु मित्रानं यशवंताच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वत:हून स्वीकारली. प्रारभींच्या काळांत शिक्षणांत अडथळे आले ते गरिबीचे तर होतेच शिवाय हिंदुस्थानांतल्या त्या काळांतल्या राजकीय परिस्थितीचे. चळवळीचे आणि त्यासाठी तारुण्यसुलभ झेप घेण्याच्या यशवंताच्या मनाचेहि होते.