इतिहासाचे एक पान. २०१

बुद्धिबळाच्या डावांत प्याद्यांची हलवाहलव अनुकूल ठरावी आणि डाव जिंकला जावा याला पुष्कळदा योगायोगाचं स्वरूप येतं. दोघेहि भिडू कसून आणि चाणाक्षपणानं, समोरच्या हालचालींचा हिशेब करून खेळी करणारे असतील, तर हा डाव जिंकण्याला महत्त्व अधिक! संयुक्त महाराष्ट्राच्या खेळींत असंच घडलं. द्वैभाषिक चांगलं चाललं आहे, स्थिर होत आहे, यशवंतराव चांगलं काम करीत आहेत असं वातावरण निर्माण झालेलं असतांनाच द्वैभाषिक मोडलं, त्याच्या विभाजनाला चालना मिळाली आणि महाराष्ट्र राज्य अवतरलं; पण अचंबा वाटणा-या या गोष्टी घडल्या कशा हें उमजल्याखेरीज बुद्धिबळाचा डाव ज्यांनी जिंकला त्यांच्या मुत्सद्देगिरीची, चतुराईची ओळख होणार नाही.

द्वैभाषिकाचा डाव जिंकला म्हणणारे, तें चांगलं चाललं आहे, स्थिर झालं आहे असं म्हणणारे भिडू गुजराती बंधु होते. ही खेळी अशीच सुरू ठेवून एक दिवस मुंबईचा वजीर कोंडींत पकडायचा आणि वाजत-गाजत आपल्या राहुटींत न्यायचा अशी या डावाची अखेरी त्यांना साधायची होती. त्याच रोखानं प्यादीं हलवलीं जात होतीं. तोंडानं मात्र यशवंतरावांचा जयजयकार सुरू होता. १९६२ च्या निवडणुकीपर्यंत द्वैभाषिकच रहावं असा गुजराती मंडळींचा कावा होता.

परंतु सह्याद्रीच्या द-या - खो-याचं पाणी चाखलेले यशवंतराव हेहि कांही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. किंबहुना पक्के गुरु आणि पक्के चेले मिळून ते एकच होते. गुर्जर-बंधूंना याचा विसर पडला असावा. चव्हाण जागरूक होते.

द्वैभाषिकाचा प्रयोग सुरू झाल्यापासून महाराष्ट्राच्या कारभाराकडे आणि वातावरणाकडे दिल्लीचं बारकाईनं लक्ष होतं. द्वैभाषिक राबवण्यासाठी मुख्य मंत्र्यांना करावी लागणारी यातायात पं. नेहरू पहात होते. मराठवाड्याच्या दौ-यांत महाराष्ट्राच्या संतापलेल्या मनाचं दर्शन त्यांना प्रत्यक्षांत घडलं. यशवंतरावांसमवेत मराठवाड्यांत ते ज्या ज्या ठिकाणीं गेले त्या प्रत्येक ठिकाणीं प्रचंड निदर्शनं झालीं आणि ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणाहि त्यांना ऐकाव्या लागल्या. द्वैभाषिक हें महाराष्ट्रांत स्थिर झालेलं नाही, हें तिथेच त्यांना उमगलं.

प्रतापगडावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणास जातांनाहि पंडितजींना महाराष्ट्रांतील विरोधी वातावरणाचं विदारक दर्शन घडलं होतं. प्रतापगडावरील समारंभ यशवंतरावांनी कुशलतेनं, कांहीहि अनिष्ट घडूं न देतां यशस्वी केला हें जरी खरं, तरी समितीनं आयोजित केलेला प्रचंड मोर्चा पहातांना, महाराष्ट्रांतील जनतेनं द्वैभाषिक मानलेलं नाही याबद्दल पंडितजींची खात्रीच झाली असली पाहिजे.

या एकूण वातावरणाचा परिणाम दिल्लीवर होत होता. मराठवाड्याच्या दौ-यानंतर पंडितजींनी याविषयी मुख्य मंत्र्यांचा – यशवंतरावांचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पं. नेहरूंनी त्यांना जेव्हा पृच्छा केली तेव्हा प्रथम मोकळेपणानं कांही सांगण्याचं यशवंतरावांनी टाळलं; परंतु पंडितजींनी पुन्हा पृच्छा करतांच यशवंतरावांनी मोकळेपणानं कबुली दिली की, द्वैभाषिक चालवण्यांत आतापर्यंत तरी आपण अयशस्वी झालों आहोंत. सध्याच्याच स्थितींत द्वैभाषिक राबवायचं तर कठोरपणानं लोकांच्या भावना चिरडाव्या लागतील आणि तो मार्ग अनुसरण्यास आपण असमर्थ आहोंत. नेहरूंनी संमती दिल्यास मुख्यमंत्रिपदास सोडचिठ्ठी देण्याचीहि तयारी यशवंतरावांनी या चर्चेच्या वेळीं दर्शवली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org