इतिहासाचे एक पान. १९३

अमृताशीं समान अक्षरं देणा-या महान् पंडितांना महाराष्ट्र शिरोधार्य मानतो हें खरं, तरी पण संशोधनासाठी इंग्रजी भाषेचा पाठपुरावा करणं आवश्यकच ठरतं. इतर भाषांमध्ये जें ज्ञानभांडार असेल, जे विचार असतील ते मराठी भाषेंत खेचून आणावेच लागतील. परंतु हें करीत असतांना वेगवेगळ्या भाषेंतलं ग्रंथांचं प्रकाशन करणारं प्रकाशन खातं असं या मंडळाचं स्वरूप बनावं हें यशवंतरावांना मान्य नव्हतं. तर एक प्रकारचं सर्जनशील, विचार करणारं हें मंडळ म्हणजे एक पॉवर हाऊस बनावं, विद्युतगृह बनावं अशी त्यांची अपेक्षा होती. महाराष्ट्राचं जीवन व्यापक आणि विस्तृत बनावं, वाढतीं क्षितिजं निर्माण व्हावींत आणि त्याचं माध्यम म्हणून मंडळानं काम करावं असा यामागचा स्वाभाविक व्यवहारी दृष्टिकोन होता. अशा प्रकारचं सर्वांगीण हेतु साध्य करणारं एखादं मंडळ जन्मास येणं हें महाराष्ट्रांत त्या वेळीं प्रथमच घडलं. १७ मे १९६२ रोजीं, वाईला या मंडळानं स्थापित केलेल्या विश्वकोश कार्यालयाचं उद्घाटन यशवंतरावांनीच पुढच्या काळांत केलं.

यशवंतरावांनी याच्या जोडीला ‘डायरेक्टोरेट ऑफ लॅंग्वेजेस’ (भाषा-विभाग) हें एक नवं खातं या काळांत सुरू केलं. सरकारी कारभारांत मराठी भाषेचा, माध्यम म्हणून उपयोग करण्यासाठी त्वरेनं उपाय योजण्यांत आले आणि सरकारी कचे-यांतला कारभार प्रादेशिक भाषेंतून चालवण्याचा निर्णय करून सर्व तालुका-कचे-यांतला कारभार तालुक्याच्या भाषेंतून चालावा, पत्रव्यवहार त्याच भाषेंतून व्हावा, असेहि निर्णय करण्यांत आले.  

लोकसाहित्य हें ‘मराठी जीवनाचं’ विशेष अंग आहे. आजवर हें लोकसाहित्य मुखोद्गत अवस्थेंतच राहिलं होतं. लोक संस्कृतीच दर्शन घडवणारं हें लोकसाहित्य अक्षरबद्ध होऊन मराठी जनतेपुढे येण्याची गरज होती. यशवंतरावांनी या कार्याचीहि मुहूर्तमेढ रोवली. लोक-साहित्य व लोक-संस्कृति संमेलन पुण्याला २३ मे १९६१ रोजीं झालं. यशवंतरावांनीच त्याचं उद्घाटन करून या कार्याचा शुभारंभ करून दिला.

राज्याची सर्वांगीण प्रगति होण्यासाठी अशा कांही मूलभूत प्रश्नांचे निर्णय ते करत होते. याच वेळीं मुंबई दूध-योजनेखाली वरळी इथल्या दूध-डेअरीची योजनाहि त्यांनी तयार केली. मुंबई शहरासमोर दूध-पुरवठ्याचा फार मोठा प्रश्न होता. त्यामुळे ३ कोटि रुपये खर्चाची ही योजना तयार झाली. ७ नोव्हेंबर १९६१ ला डेअरीच्या योजनेचं काम सुरू झालं आणि पुढच्या १८ महिन्यांतच तें पूर्ण करून घेतलं गेलं. आरे-दुग्धालयांत डेअरी टेक्नॉलॉजी संस्थेमध्ये पहिला भारतीय दुग्धालय डिप्लोमा अभ्यासक्रमहि त्यांनी आपल्या कारकीर्दींतच सुरू केलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषि संघटनेच्या विद्यमाने डेन्मार्कचं सरकार आणि भारत सरकार यांनी संयुक्तरीत्या पुरस्कारलेला दुधाच्या धंद्याबाबतचा दुसरा शिक्षणवर्गहि त्यांना आरेदूधवाडींत आणला.

कोकण भागांत दिवा-दासगाव मार्गावर रेल्वे सुरू करून कोकणांत रेल्वे पोंचवण्याचं श्रेय यशवंतराव यांचंच आहे. दिवा-पनवेल या रेल्वे-मार्गाचं काम त्यांनी भारत सरकारची मान्यता मिळवून आपल्याच कारकीर्दीत सुरू केलं.

मराठवाड्यांतल्या कला व क्रीडा-गुणांना उत्तेजन देण्यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना, राज्य-कामगार योजनेखाली मुबईंत महात्मा गांधी स्मारक इस्पितळ, महाराष्ट्रांतलं पहिलं नर्सिंग कॉलेज, पहिली नेत्रपेढी, माजी सैनिकांसाठी साता-याला प्रशिक्षण तथा उत्पादन-केंद्र, नाशिकला सर्वसाधारण व सर्व सुखसोयींनी सुसज्ज असं क्षयरोग चिकित्सालय, झाडूवाल्यांनी डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या पद्धतीस बंदी, शुगर फार्मचं राष्ट्रीयीकरण, असे सर्व प्रकारचे, जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे किती तरी निर्णय यशवंतरावांनी करून सारा महाराष्ट्र प्रगतीच्या कामाला लावला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org