इतिहासाचे एक पान.. १८

एक दिवस अशीच सवड काढून पत्नीला आणि मुलांना पहाण्यासाठी ते देवराष्ट्रला गेले. मोटारीची सोय तेव्हा नव्हतीच. कराडहून रेल्वेनं ताकारी स्टेशन आणि तेथून पायपीट करीत देवराष्ट्र, असा प्रवास करावा लागे. देवराष्ट्र गाव लहान. गावांत येण्याचा रस्ता ठरलेला. बळवंतराव गावांत पोंचले त्या वेळी मुलं रस्त्यावर खेळत होती. लहानग्या यशवंतानं लांबूनच वडिलांना येतांना पाहिलं आणि त्यांच्या रोखानं धूम ठोकली. मातींत खेळून मातीनं भरलेला यशवंता धांवत धांवत वडिलांपर्यंत गेला आणि त्यानं त्यांच्या पायाला मिठी मारली. पण बळवंतरावांनी नेहमीसारखं त्याला वरच्यावर उचलून पोटाशीं धरलं नाही. संथपणानं ते चालत येत होते, तसंच यशवंताला घेऊन ते घरीं पोचले. विठाई घरींच होत्या. बळवंतराव थकलेले दिसत होते. आवाज खोल गेला होता. त्यांनी प्यायला पाणी मागितलं, ताप आलाय म्हणाले आवाज आणखी खोल गेला. ताप आलाय् म्हटलं की त्या वेळी घरांतल्या माणसांच्या मनांत चर्रर्र होत असे. प्लेग सुरु होता. त्यामुळे ताप आलाय् म्हणजे घरांत प्लेग आलाय् याचीच ती खूण असायची. बळवंतरावांचा खोल गेलेला आवाज, त्यांना चढलेला ताप, विठाईच्या काळजाचं पाणी पाणी झालं. प्लेगनं त्यांच्या सौभाग्यालाच आव्हान दिलं होतं. प्लेगनं उद्ध्वस्त केलेले संसार त्यांच्या समोरुन सरकूं लागले. बळवंतराव धीराचे. त्यांनी विश्रांति घेतल्यासारखं दाखवलं, परंतु ताप वाढत राहिला होता. तो तसला ताप अंगावर घेऊनच त्यांनी ताकारी तें देवराष्ट्र असा पायी पल्ला गाठला होता. एकेक दिवस पुढे सरकूं लागला, पण ताप कमी होण्याचं लक्षणं दिसेना. असेच चार-पांच दिवस गेले आणि मग सारंच थंड झालं.

देवराष्ट्राला चालत आलेले बळवंतराव सरळ देवाघरीं चालत गेले. विट्याहून निघाल्यापासून त्यांचा पाठलाग करत आलेला अंधार अखेर त्यांना आपल्या साम्राज्यांत घेऊन गेला. घडल्यानंतर उमजलेला हा नियतीचा निर्णय ! पळत जाऊन पायाला मिठी मारली ती यशवंताची वडिलांशीं झालेली अखेरची भेट! कायम लक्षांत रहावी अशी ! बळवंतरावांचा तो आजारहि शेवटचा आणि लहानग्याशीं झालेली त्यांची भेटहि शेवटचीच. चार वर्षाच्या यशवंताला वडिलांना पाहिल्याचं स्मरतं तें तेवढंच !

बळवंतराव देवाघरीं गेले ; मुलांना मिळणारी पित्याची सावली गेली. विठाईचं सौभाग्य हरवलं. चव्हाण-कुटुंबाचा आधारवृक्ष उन्मळून पडला. थोरला मुलगा ज्ञानोबा सोळा-सतरा वर्षांचा, गणपतराव दहा वर्षांचा आणि यशवंता चार वर्षांचा. पालनकर्ताच गेला. कुटुंब संपल्यासारखीच अवस्ता. मागे राहिली विठाई आणि चार लहानगीं. यशवंताच्या पाठीवर विठाईनं आणखी एक बालकाला जन्म दिला, पण तें लहानगं लहानपणींच निघून गेलं होतं. गरीब कुटुंब आणखी गरीब बनलं होतं.

घराचा आधार गेल्याच्या दु:खानं सारींच होरपळलीं. विठाईच्या मनाला गरिबीच्या डागण्या दैनंदिन जीवनांत हैराण करुं लागल्या. पति-निधनानंतरचे दिवस उलटत राहिले. महिना-दीड महिना असाच गेला. विठाईला आता स्वत:ला विचार करावा लागणार होता. सासरचं पतीचं उरलंसुरलं सुखहि संपलं होतं आणि माहेरीं राह्यचं तर सा-यांनाच अडचणींत ढकलावं लागणार होतं. घाडगे-कुटुंब खाऊन-पिऊन सुखी असलेहि, परंतु तेंहि एक सामान्य शेतक-याचंच कुटुंब होतं. सधन शेतक-याचं नव्हे. चार मुलांसह विठाईनं तिथेच मुक्काम करणं घाडगे-कुटुंबाला झेपणारं नाही याची त्या बिचारीला जाणीव होती. त्याच घरांत ती लहानाची मोठी झालेली असली तरी. आपल्या पोटच्या लहानग्यांना मोठं करण्यासाठी तिला आता बाहेरचा रस्ता धरणं क्रमप्राप्त होतं. विचार करण्यांत दिवस चालले होते अन् मग एक दिवस कुणाचाच आधार नसलेलं हें कुटुंब - आई आणि चार मुलं देवराष्ट्र सोडून निघालीं. बळवंतराव कराडांतून उठून देवराष्ट्राला आणि तिथून सरळ देवाघरीं गेले होते. बळवंतरावांच्या कराडांतल्या उजाड घरांत, देव नसलेल्या देव्हा-यांत, पोचंण्याचा विचार विठाईनं केला होता. चार मुलांना संगती घेऊन विठाई मग कराडला पोचंली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org