इतिहासाचे एक पान.. १६

आशेच्या मागे चालत रहायचा सराव बळवंतरावांना झालेला होता. असेच एक दिवस बळवंतरावांचे पाय रतीबवाल्या सबूजज्जांच्या घराकडे वळले. रतिबाच्या दुधाचे पैसे घेण्यासाठी त्यांचा उंबरठा त्यांनी अनेकदा ओलांडला होता. बाजाराच्या दिवशीं या घराकडे जायची सवय त्यांना होतीच. परंतु आजचं त्यांचं जाणं काही वेगळं होतं. एका वेगळ्या आशेचं बोट धरुन ते वाड्यांत पोंचले होते. शेती करुन, कष्ट करुन पोट  भरत नाही तेव्हा आता एखादी नोकरी करावी असं त्यांना अलीकडे वाटूं लागलं होतं.

चार-दोन ठिकाणीं त्यांनी प्रयत्नहि केले. पण शिक्षण नाही - अडाण्याला नोकरी कोण देणार ! तरीहि नोकरीच्या आशेनं ते सबूजज्जांकडे आले होते. एक अडाणी शेतकरी, तोडानं विनंती हाच त्याचा अर्ज. सबूजज्जांची तोंडदेख होतांच त्यांनी अर्ज पेश केला. सबूजज्जांनी यापूर्वी अनेक गुंतागुंतीच्या अर्जांचा निकाल दिला होता; परंतु बळवंतरावांचीं चांगदेवाच्या को-या कागदावरील अक्षरं वाचून निकाल देण्याचं काम आयुष्यांत त्यांना प्रथमच करावं लागणार होतं. या जाणिवेमुळेच एक दिवस सबूजज्जांनी निकाल दिला.  हा निकाल अर्थातच बळवंतरावांना अनुकूल असा होता. सबूजज्जांनी बळवंतरावांना नोकरी देऊ केली होती. तीहि सरकारी - बेलिफाची अन् त्या निकालासरशी बळवंतराव एक दिवस विट्याच्या कोर्टेातील बेलिफ म्हणून रुजूं झाले. चव्हाण-कुटुंबाच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरु झाला.

बळवंतरावांचं कुटुंब आता सहा माणसांच झालं होतं. थोरला ज्ञानोबा, मुलगी राधाबाई, तिसरा गणपत आणि चौथा यशवंत. यशवंताच्या जन्माच्या वेळीं, विठाईच्या आईनं सागरोबाला सांकडं घातलं होतं. "हाताला यश दे, घरात तुझी आठवण ठेवीन " अशी काकुळती केली होती. आईच्या हाताला सागरोबानं यश दिलं आणि मग विठाईच्या आईनं आपल्या नातवाचं नांव यशवंत असंच ठेवलं होतं. - घरांत कायमची आठवण म्हणून ! भावंडांबरोबर यशवंत आता विट्यांत वाढत होता.  बेलिफाच्या नोकरीच्या पगारांत आणि शेतींतून मिळणा-या तोकड्या धान्यांत कुटुंबाचं पोषण होऊं लागलं. तीन-चार वर्ष अशींच गेलीं. कुटुंब हळूहळू आकार धरुं लागलं. कष्ट कमी झालेले नव्हते, परंतु उपाशी रहावं लागत नव्हतं.

अन् एक दिवस विटें सोडून क-हाडला जाण्याचा हुकूम बळवंतरावांना मिळाला. सरकारी नोकराला नेहमीच आपलं बि-हाड पाठीवर बांधून ठेवावं लागतं. नोकरींत रूजूं होतांना गाव सोडावं लागेल याची बळवंतरावांना कल्पना नव्हती ; परंतु न्यायखात्यानं तो प्रसंग निर्माण केला. बळवंतराव मुळांतच गोगलगायीच्या पंथांतले. कुणाचा धक्का लागण्यापूर्वीच, धक्का लागेल या धास्तीनं, पोटांत पाय घेऊन, स्वत:च्याभोवतीं गुंडाळी करुन बसणारे! त्यांच्यावर आता बि-हाड हालवण्याची वेळ नोकरीनं आणली होती.

विचाराला वेळ नव्हता आणि विचार करुन उपयोगहि नव्हता. नोकरी सोडून केवळ शेतीवर भागणारं नव्हतं. नोकरी हाच मोठा आधार ठरला होता. म्हणून एक दिवस ते सारेजण कराडांत दाखल झाले. विट्यांतला दुधाचा रतीब संपला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org