इतिहासाचे एक पान.. १५

बळवंतराव चव्हाणांचं कुटुंब त्यांच्या आजोबांच्या वेळी भाळवणी गाव सोडून विटें गावांत स्थायिक झालं होतं. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांना गाव सोडावं लागलं. पांच-सहा माणसांची गुजराण होईल एवढं शेतीचं उत्पन्न नव्हतं. विटें गाव त्यांतल्या त्यांत मोठं. तालुक्याच्या सरकारी कचे-या-कोर्ट याच गावांत. आठवड्याचा बाजार भरायचा तो विट्यालाच. शेतींत मिळेल त्या उत्पन्नावर बळवंतराव संसाराचा गाडा रेटीत होते. परंतु खाणारीं माणसं वाढलीं अन् गाडा रेटणं कठीण होऊं लागलं. आई वडिलांनी एक वेळच्या जेवणावर थांबावं, पण मुलांना तें झेपणारं नव्हतं. बळवंतरावांचा, अक्काचा जीव मुलांकडे पाहिलं की कळवळायचा, पण इलाज सापडत नव्हता. सारेच गरीब. दोस्तीहि गरिबांचीच. एकाची अडचण तीच दुस-याची. प्रत्येकाची कथा गरिबीची, व्यथाहि गरिबीची, फुटकळ खर्चाची वाण. दिवसभर दोघांनी कष्ट उपसले तरी सायंकाळी सर्वांना पोटभर खातां येईल एवढी मिळकत क्वचितच ! बळवंतराव शेतांत खपत होते, थोडं फार धान्य घरीं आणत होते, पण जें मिळत होतं तें काही दिवसांपुरतं. गरिबाच्या घरांत उन्हाळा कायमचाच. बळवंतराव, विठाई उन्हाळ्यांतच करपत होतीं. स्वत:च्या शेतीच्या जोडीला दुस-याची शेती वांट्यानं करुन ते संसाराचा गाडा रेटूं पहात होते. त्यांना कष्टाची फिकीर नव्हती.

शेतकरी असो. शेत-मजूर असो. खेड्यांतला माणूस एखादं जनावर आपल्या दावणीला बांधायच्या प्रयत्नांत असतोच. दुभतं जनावर त्याच्या संसाराला मदतहि करतं. जमलं तर गाय, म्हैस किमान एखादी शेळी. त्याचं दुधदुभतं घरांतल्या मुलांना मिळत असतं. दुधाचा रतीब लावून तो आपली फुटकळ खर्चाची सोय करतो. चटणी-मिठाला तेवढाच आधार. शेतक-याच्या दावणीला शेतीसाठी बैल असलाच पाहिजे. बळवंतरावांनी मोठ्या कष्टानं एक बैल पैदा केला होता. बैलांची उसनवारी करुन, वांट्यानं गरीब शेतकरी शेतीचं काम करीत रहातो. बळवंतराव तेच करत होते. त्याच्या जोडीला एक दुभतं जनावरहि त्यांनी दावणीला आणलेलं होतं. फुटकळ खर्चाची ओढाताण होतीच. त्यासाठी त्यांनी एक घरीं रतीब जोडला.

विटें गावीं त्या वेळीं एक सबूजज्ज होते. मोठा भला माणूस होता. बळवंतरावांना योगायोगानं त्यांच्या घरचाच रतीब मिळाला. शेतांत कष्ट करावेत, जनावरं सांभाळावींत, तुटपुंज्या पैशात बायको-मुलांचा सांभाळ करावा आणि उद्याची चिंता उशाशीं ठेवून रात्र काढावी हें बळवंतरावांचं जीवन. संसाराच्या काळजीनं आणि जबाबदारीच्या कष्टाच्या ओझ्यानं वांकून गेलेला हा माणूस - सामान्य शेतकरी. खर्चाच्या पैशासाठी अंतराळांत बघत, जीवन जगणं क्रमप्राप्तच होतं. चव्हाण-कुटुंबाला शिक्षणाची ओळख नव्हती. मुलांना निसर्ग वाढवत होता. बळवंतराव आणि विठाई यांच्या मनांत मात्र काळजी वाढत होती. गरिबीचं संकट घरांत कायमचंच मुक्कामाला होतं. बळवंतरावांची संसारांतील ताणाताण सबूजज्ज पहात होते. त्यांना सहानुभूति होती. पण त्यांनाहि कांही उपाय सुचत नव्हता. बळवंतराव आणि विठाई यांच्या जीवनांतील काळजीच्या बेरजेचं अंकगणित रोज सुरु होतं. फक्त धडपड होती - जगण्याची आणि बायको-मुलांना जगवण्याची ! त्या धडपडण्याला कुणी जिद्द म्हणत असतील, परंतु तो अर्थ माहिती  असतो फक्त सुखाचा घास खाणा-यांना. जीवनाचा अन्वयार्थ लावण्याइतकी गरिबांना सवडच नसते. त्यांचा आधार जमीन आणि पांघरुण आकाश. त्यांच्याकडे पाहून प्रेमाचा, आपुलकीचा शब्द खर्च करायला कुणाला फुरसत नसते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org