इतिहासाचे एक पान.. १४

रात्री जेवळवेळ टळून गेल्यावर देवळांत भजनाचा फड जमला, पण या कशांतच दाजीबा घाडगे नव्हते. त्यांच्या घरांतलंहि कुणी नव्हतं. दाजीबा घाडग्यांच्या घरांत आज वेगळीच धांदल उडाली होती. दाजीबा घाडग्यांची बहीण विठाबाई ही बळवंतराव चव्हाण यांना दिली होती. शेतक-याच्या घरांतली मुलगी दुस-या शेतक-याच्या घरांत गेली होती. बळवंतराव चव्हाण हे मूळचे भाळवणी गावचे. खानापूर तालुक्यांतीलच हें गाव. विटें गावापासून पांच-सहा मैलांवरील एक खेडं. भाळवणी, कळंबी, ढवळेश्वर, आळसुंद अशी ही विट्या-भोवतालची पंचक्रोशी. बळवंतरावांचे आजोबा विट्याला स्थायिक झाले होते. विट्याला  त्यांची तीन-चार एकर शेती होती. जमीन कोरडवाहू, जेमतेम दोन-पांच पोतीं धान्य देणारी. बळवंतराव अन् विठाई तसेच दिवस ढकलत होते. विठाई आता तीन मुलांची माता होती. पहिला ज्ञानोबा, दुसरी मुलगी राधाबाई आणि नंतरचा गणपत. विठाई आता चौथ्या बालकाला जन्म देणार होती. दाजीबा जरा ब-या स्थितींतले. बाळंतपणासाठी म्हणूनच ती माहेरीं देवराष्ट्राला आली होती. अक्काचं बाळंतपण घरीं होतंय याचा घाडग्यांच्या घरांतल्या सगळ्यांनाच आनंद होता. विठाईच्या आईची गडबड उडाली होती.

अक्काचीं पहिली तीन बाळंतपणं सुखरुप झालीं होती. आता चौथं. पण या वेळीं अचानक परिस्थिती वेगळी बनली. त्या दिवशी संध्याकाळपासूनच घरांत गडबड सुरु झाली होती. विठाईंची आई धीराची. मनांत काळजी ठेवून विठाईला धीर देण्याचं काम आईला करायचं होतं. तें सुरु होतं. पण वेळ अधिक पुढे सरकत राहिला तसा आईचा धीर सुटूं लागला. अक्काची तर घालमेल सुरु झाली. बाळंतपण जोखमीचं ठरलं. गाव खेडं, दवापाण्याची सोय नाही. तालुक्याच्या गावीं पोंचण्याची तातडी करावी तर बैलगाडीशिवाय वाहन नाही. जेवणवेळ टळली तेव्हा अक्काची शुद्ध हरपली होती.  आईच्या जिवाला घोर लागला.सर्वच घाबरले. अक्कावरचं प्राणसंकट टळायला हवं होतं. बेचैनी क्षणाक्षणाला वाढूं लागली. आईनं नेहमीचं दवापाणी केलं. गावांतल्या म्हाता-या अनुभवी बाया जमल्या. त्यांच्यांतल्या कांहीजणींजवळ, प्रसृतीचे हमखास उपाय होते. सर्व उपाय झाले, पण प्रसूतीचं चिन्ह दिसेना. खेडेगावांत अशा वेळीं एकच उपाय शिल्लक उरतो. देवाचा धावा. देवाला साकडं घालायचं, नवस बोलायचे, अंगारा लावायचा, देवाला कळवळून साद घालायची. सांगायचं, या जिवाला जगव. काकुळती करायची. घाडग्यांच्या घरांत हीच वेळ आता आली होती. सर्व उपाय थकले. तसे आईचे अनुभवी हात ढिले पडले. थरथरते हात मग एकत्र आले. आईनं सागरोबाला हात जोडले. काळुळतीनं विनवलं. अक्काला जगव. माझ्या हाताला यश दे, तुझी आठवण घरांत कायम ठेवीन.

१२ मार्च १९१४. परमेश्वराचा, नियतीचा अनुग्रह विचित्र असतो. अव्यक्त रुपानं तो कृपा करतो. आईच्या मनांत सागरोबाचं प्रेम अपार. निष्ठा निस्सीम. रात्रीच्या वेळीं, त्या अंधारांत, नीरव शांततेंत आईनं सागरोबाला घातलेली साद सागरोबापर्यंत पोंचली ! सागरोबा हाकेला धावला. आईच्या हाताला त्यानं यश दिलं. देवळांत अभंग सुरु होता. 'हेचि दान देगा देवा' - घाडग्यांच्या घरांत त्याच वेळीं बालक जन्मलं. अक्काची सुखरुप सुटका झाली होती. आईच्या डोळ्यांत आनंदाश्रु दाटले. अक्का किलकिल्या डोळ्यांनी आसपास पाहूं लागली होती. चिमणीच्या उजेडांत तिला कांही दिसत नव्हतं, पण बालकाचा आवाज कानांत शिरत होता. बरं वाटत होतं. बाळ-बाळंतीण सुखरुप. दाजीबांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यांच्या घरांत एका जिवाची श्रीमंती वाढली होती. तोच एक आनंद.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org