इतिहासाचे एक पान. १३५

कायदा, सुव्यवस्था आणि शांतता यांचा भंग होऊं नये यासाठी पोलिसांनी समितीच्या निदर्शकांना त्यानुसार वाईंतच थांबवून ठेवलं. समारंभ ३० नोव्हेंबरला होणार होता. त्याच्या आदल्या दिवशीं वाईमध्ये समितीचे हजारो लोक व सर्व नेते येऊन दाखल झाले आणि वाईपासून कांही अंतरावर, पंडितजी जाण्याच्या मार्गावरच त्यांनी तळ ठोकला. वाई-महाबळेश्वर रस्त्यावर, पांचगणीचा घाट जिथून सुरू होतो तिथेच समितीचे सर्व लोक थांबल्यानं आणखी एक पेंच निर्माण झाला. समारंभाला जाणा-या काँग्रेस-जनांच्या मोटारी याच मार्गानं जाणार होत्या. तिथे घोषणांचं युद्ध आणि त्यांतून कुरापत निघण्याची शक्यता होती. पोलिस-बंदोबस्त मोठ्या प्रमाणांत असला, तरी पोलिसांनी नम्रतेनं वागावं अशा सूचना यसवंतरावांनी दिलेल्या होत्या; परंतु वातावरण तंग बनण्याचा प्रसंगच निर्माण होऊं नये, यासाठी काँग्रेस-जनांनी वाई-महाबळेश्वर या मोठ्या मार्गानं न जातां, त्यांना अन्य मार्गानं जातां यावं यासाठी, वाईच्या पश्चिमेला कृष्णानदींतून व ओढ्यांतून लांबून जाणारा एक रस्ता तात्पुरता तयार करून देण्यांत आला. हा रस्ता, मुख्य रस्त्याला घाटाजवळ पायथ्याला येऊन मिळत असल्यानं मग त्याच मार्गानं वाहतूक सुरू झाली. लोकांना घेऊन जाणारे ट्रक या मार्गानं पुढे गेले. निर्दर्शकांना ते किंवा त्यांना निदर्शक दिसतच नव्हते. अशा प्रकारे या समारंभाच्या निमित्तानं होणारं पानिपत टळलं.

पं. नेहरू हे ३० नोव्हेंबरला पुणेंमार्गे मोटरीनं प्रतापगडला जाणार असल्यानं ७५ मैल लांबीच्या या रस्त्यावर ठिकठिकाणीं त्यांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यांत आल्या होत्या. यशवंतराव हे पंडितजींच्या बरोबरच मोटरींत होते. पंडितजींची मोटार वाईहून पुढे जात असतांना, रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या समितीच्या लोकांनी विरोधी घोषणा केल्या, परंतु कोणताहि अनुचित प्रकार न घडतां मोटार पुढे गेली आणि ऐतिहासिक समारंभाच्या ठिकाणापर्यंत सुखरूप जाऊन पोंचली. प्रतापगडावरील समारंभहि थाटानं, उत्साहानं झाला.

समारंभ यशस्वी रीतीनं पार पडल्यानंतर यशवंतरावांनी, काँग्रेस-जनांना आणि समितीलाहि धन्यवाद दिले. या समारंभानंतर फलटण इथे सातारा जिल्हा-काँग्रसेची एक सभा झाली. या सभेंत यशवंतरावांनी सांगितलं की, शिवछत्रपतींनी राष्ट्राला इतिहास व संस्कृति दिली; परंतु छत्रपतींच्या पुण्याईला मागे टाकून पुढे जाण्याचा अहंकार समितीनं बाळगला होता. प्रतापगडावरील मंगल सोहळ्यानं मात्र हेंच सिद्ध केलं की, शिवछत्रपतींचं नांव अजराम असून मोठंहि आहे. इतर कोणत्याहि निष्ठेपेक्षा राष्ट्रनिष्ठा अधिक तेजस्वी आहे, हें प्रतापगडावर दिसलं. प्रतापगड समारंभानं महाराष्ट्राचा आत्मा राष्ट्रनिष्ठेच्या बाहेर गेला नाही हेंच दिसून आलं; आणि हें चित्र महाराष्ट्रांतल्या काँग्रेस-कार्यकर्त्यांना भूषणावह आहे.

या समारंभाच्या वेळीं एक राष्ट्-नेता दुस-या एका राष्ट्र –नेत्याबद्दल आदर प्रगट करण्यासाठी येत होता. अशा मंगल समारंभाला अपशकुन करण्याचा घाट समितीनं घातला होता; परंतु महाराष्ट्रांतील विचारी आणि जागृत जनतेनं विचार करून समारंभ यशस्वी करण्यास तळमळीनं सहकार्य दिलं, याबद्दल महाराष्ट्रांतील जनतेला आणि काँग्रेस-कार्यकर्त्यांना यशवतरावांनी धन्यवाद दिले. समितीनंहि शिस्त आणि संयम राखण्याचं सौजन्य दाखवलं, याबद्दल समितीच्या मंडळींनाही त्यांनी धन्यवाद दिले.

निवडणुकीनंतर यशवंतराव द्वैभाषिकाचे पुन्हा मुख्य मंत्री झाले होते. संयुक्त महाराष्ट्राचा पेंच कायम होता. निवडणुकीनं त्याचं दर्शन घडवलं होतं. अशा स्थितींत राज्य चालवायचं तर राज्यांतल्या जनतेचं समाधान होईल असंच कांही करावं लागणार होतं. प्रतापगडच्या समारंभाच्या निमित्तानं जनतेची नाखुषी पत्करण्याचा प्रसंग निर्माण झाला. तो प्रसंग उद्भवला, परंतु यसवंतरावांनी ही अवघड कामगिरी मोठ्या मुत्सद्दीपणानं पार पाडली. त्यांच्या राजकारणाचं कौशल्यच यातूंन महाराष्ट्राच्या समोर आलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org