महाराष्ट्रांत निर्माण झालेल्या वातावरणानं यशवंतराव बेचैन झाले. प्रतापगडावर समारंभाची जय्यत तयारी त्यांनी सुरू ठेवलीच होती. पंडितजींना मोटारीनं गडावर जातां यावं यासाठी रस्ता तयार करून घेण्यांत आला होता. छत्रपतींचा ३८ फूट उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा गडावर पोचला होता. हा समारंभ थाटानं, छत्रपतींच्या आणि महाराष्ट्राच्या इतमामाला साजेसा व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न होता. समितीच्या नेत्यांना त्यांचं त्यासाठी आवाहन सुरू होतं.
मुंबईतील त्यांच्या एका सत्कार-समारंभांत त्यांनी असंच आवाहन केलं आणि सावधानतेचा इशाराहि दिला. त्यांनी सांगितलं, “प्रतापगडावरील कार्यक्रम ही शिवरायांची महान् सेवा आहे. भारताच्या ४० कोटि जनतेच्या वतीनं हा कार्यक्रम होत आहे. तेव्हा या निदर्शनाचा समितीच्या पुढा-यांनी पुन्हा विचार करावा. कांही मंडळींना निवडणुका जिंकल्याचा फारच अभिमान झाला आहे. आम्हींहि २५ वर्षं निवडणुका लढवल्या आहेत आणि त्या जिंकल्या आहेत. लोकशक्तीचा वापर योग्य रीतीनं करा, असं मला या मंडळींना सांगायचं आहे. प्रतापगडावर निदर्शनं करून हे लोक स्वत:ची फसवणूक करत आहेत. घोषणांनी शेकडो, हजारो लोक फसतात. यापुढे त्यांना फसवूं नका. आपल्याला जनेतनं लोकशक्तीचा जो पाठिंबा दिला आहे त्याचा उघड्या डोळ्यानी वापर करा, असं मी पुन्हा एकदा सांगतों. सावधान!
“समितीनं निदर्शनाचा निर्णय करून प्रेतावरून जाण्याची त्यांची भाषा सुरू होती. त्यांनी पूर्वीचे विचार आता बदलले आहेत आणि नुसत्या घोषणा करण्याचा निर्णय केला आहे; परंतु अशा महत्त्वाच्या व मंगल प्रसंगीं घोषणाहि करूं नयेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी जरूर ते सर्व प्रयत्न करा. तुमचा तो अधिकारच आहे. पण हे प्रयत्न प्रतापगडावर नकोत. त्यासाठी दोन हजार चौरस मैल भारताची भूमि मोकळी आहे. आपल्या भावना व्यक्त करण्याची जागा प्रतापगड ही नव्हे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो-सावधान!”
समारंभाच्या दिवसापर्यंत अशा प्रकारे उलटसुलट मतप्रदर्शन होत राहिलं असलं, तरी सातारा जिल्ह्यांतल्या जनतेनं मात्र निदर्शकांशीं सामना करण्याची जय्यत तयारी करून ठेवली. गावोगावच्या हजारो शिव-प्रेमींना समारंभास उपस्थित रहातां यावं यासाठी खास वाहनांची व्यवस्थाहि केली गेली. त्याचबरोबर निदर्शकांना प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत निदर्सनासाठी पोंचतां येणार नाही याचीहि सरकारनं दक्षता घेतली. काँग्रेस-जनांची रहदारी मालमोटारी भरून सुरू राहिली, परंतु समितीला मालमोटारी वापरण्याची परवानगी नाकारण्यांत आली. कोकणांतून महाड, पोलादपूरच्या बाजूनं आणि सातारा जिल्ह्यांतून वाई, मेढा या बाजूनं, हजारो लोकांची रीघ प्रतापगडाकडे सुरू झाली. समितीच्या बाजूनंहि हजारो निदर्शक वाईमध्ये तुकड्या- तुकड्यांनी येत राहिले. दोन्ही बाजूंनी अमाप उत्साह निर्माण झाला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशीं लाखानं जनता उपस्थित रहाणार असं स्पष्ट झालं.
हीं दोन्ही सैन्यं समोरासमोर येतांच प्रथम घोषणांचं युद्ध आणि मागोमाग प्रसंग हातघाईचा निर्माण होणार, ही अगदी काळ्या दगडावरची रेघ होती. आयत्या वेळीं कोण कशी ठिणगी टाकील याचा नेम नव्हता प्रसंग ओळखून मग यशवंतरावांनी समितीमधील समजूतदार गोटांत वाटाघाटीसाठी प्रवेश केला. महाबळेश्वरचा आणि पोलादपूरच्या बाजूचा घाट ओलांडून दोन्ही बाजूचे लोक प्रतापगडापर्यंत पोंचतील, तर गडाच्या पायथ्याशीं भीषण प्रसंग निर्माण होऊन परिस्थिति कुणाच्याच हातांत रहाणं शक्य नव्हतं. शिवाजी-अफजुलखान भेटीनंतर, अफजुलखानाच्या सैन्याची जी लांडगेतोड करण्यात आली तो प्रसंग महाराष्ट्रांतील जनतेच्या मनांत त्या काळांत तरंगत होता. यशवंतरावांनी परिस्थितीचा धोका, समजूतदार पुढा-यांच्या नजरेला आणल्यानंतर चर्चा होऊन देशावरील समितीच्या लोकांनी वाईच्या पुढे येऊं नये आणि कोकणांतील पुढा-यांनी पोलादपूरच्या पुढे चाल करूं नये, तिथेच थांबून सभा घ्याव्यात, घोषणा कराव्यात, असा निर्णय झाला.