इतिहासाचे एक पान.. १३

चंदन ही एक अशी वनस्पति असते की, पाला निघून गेल्यावरहि जमिनींत दडून बसलेलं त्याचं मूळ वर्षानुवर्षे टिकून रहातं. तें अधिकच सुगंधित बनतं. या सुगंधाला मग सारेच वश होतात. सागरोबाच्या कुशींत पूर्वी चंदनाचे, बेलाचे वृक्ष होतेच. सागरोबाच्या पूजेची ती नैसर्गिक व्यवस्था असावी. सागरोबाचं शिवार ही देव-देवेन्द्रांची स्वप्रभूमि. सिद्धांच्या भाव-परिमलानं भरलेली, भारलेली. देवपण घेऊन जन्माला आलेला हा आसंमत. या आनंदवनांत धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारहि पुरुषार्थ उभे. इथलीं माणसं आणि त्यांची मनं सकस. इथल्या मनोभूमींत पूर्वी अनेक माणसं मोठीं झालीं. इतिहासाचा विषय ठरलीं. इतिहासाला प्रसंगीं त्यांनी आव्हानं दिलीं. माणूस इतिहास घडवतो हें तर खरंच; पण इतिहास माणसाला घडवतो हें त्यापेक्षा अधिक खरं. माणसाला घडवण्याचीं इतिहासाचीं हत्यारंहि ठरलेलीं असतात. माणूस स्वस्थानीं बसून सुखाचा विचार करतो, सुखाचा इतिहास घडवण्याचे बेत आखतो. एक-दोन धुळाक्षरंहि काढतो. इतिहासाचा श्रीगणेशा सुरु करतो अन् त्याच वेळीं इतिहासाची अदृष्टांत खूण होते. इतिहासाचा खेळ मग सुरु होतो. माणसांच्या भोवतीं संकटांचं रिंगण पडतं. हा खेळ नेहमीच चालतो. ज्याला घडवायचा त्याला तो यांतूनच घडवतो आणि ज्याला घडायचं त्याला, या आयुधांचा मारा खातच घडवून घ्यावं लागतं. इतिहास ज्याला ताब्यांत घेतो त्याच्या ललाटावर नियति हें सारं अगोदर लिहीत असली पाहिजे. सागरोबाच्या कुशीत दडलेल्या चंदनाला असंच केव्हा तरी पान फुटतं. इतिहास त्याच्याकडे पहातो आणि दोघेहि मग परस्परांचा ताबा घेतात. इतिहास घडतो म्हणतात तो असाच कांही तरी !

थंडीचा मोसम संपत आला. नवी पालवी वसंतागमन सुचवीत होती. माळरानं तापूं लागलीं. पिकं निघालीं. मोकळ्या बैलगाड्यांत कधी कडबा, भुस्कट असायचं. धान्य अगोदरच कणगींत आलं होतं. रानांतलीं कामं संपलीं होतीं. गावालगतच्या माळावर पोरांचे खेळाचे डाव आता सुरु असत. सायंकाळी गावांतल्या देवळासमोरच्या पारावर तंबाखूचे अड्डे जमायचा हा मोसम. या अड्ड्यांत मग अनेक बेत ठरायचे. देवराष्ट्र गाव तसं लहान; इथे कुणी मोठा जमीनदार नाही, कुणी सावकार नाही, मध्यमवर्गींहि नाही. सारे शेतकरी, सारे गरीब, काबाडकष्ट करुन जगणारे !

दाजीबा घाडगे हे गावांतले असेच एक शेतकरी. पारावरच्या अड्ड्यावर ते असायचेच. डोईला फेटा, अंगांत परैण, उंचापुरा, नाकेला, शरीरानं भरलेला - असे दाजीबा. पारावर दररोजचा अड्डा बसला. चिलमींतून धूर निघूं लागला.  गप्पा इकडल्या तिकडल्याच; कोणाची कुचाळकी नाही... पण अशा गप्पा सुरूच होत्या. शिमग्याला कुणाचा तमाशा आणायचा. जत्रेला फड कुणाचा, या गप्पा तर व्हायच्याच. जोडीला. गावांत कुणी कुणाची कुरापत काढली असेल, धनगरांनी कुणाच्या शेतांतलं झाड मेंढरांसाठी खडसलं असेल किंवा कुणाच्या शेतांत कट्टे काढायचं काम, विहिरीचं काम व्हायचं असेल, ताली धरायच्या असतील तर त्याचाहि हिशेब इथेच व्हायचा. कडूसं पडल्यानंतर जमणारी मंडळी जेवणवेळेपर्यंत गप्पा करीत. अन् जेवायला घरीं जात. कारण देवळांत भजनाचा किंवा भेदिक लावण्यांचा फड जमायच्या वेळीं त्यांना परत यायचं असे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org