इतिहासाचे एक पान. १२२

गोरगरीबाबद्दल सहानुभुती बाळगणा-या नेत्यांचा एक वर्ग असतो, परंतु सर्वसामान्य जनतेच्या दुःखांशीं त्यांचा दुरूनच संबंध येतो. महाराष्ट्रांत यशवंतराव चव्हाण यांच्यापूर्वी झालेले मुख्य मंत्री धनजीशहा कूपर, बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई हे या वर्गातले नेते होते. गरीबया शब्दाशीं त्यांची ओळख असली तरी गरिबी ही प्रत्यक्ष काय वस्तु आहे तें त्यांनी अनुभवलेलं नव्हतं. यशवंतरावांची स्थिती अगदी वेगळी होती. त्यांचा जन्म गरिबीतच झाला, शिक्षणहि गरिबीतच झालं. गरिबांच्या संगतीत राहूनच त्यांनी राजकीय कार्य केलेलं असल्यानं ते मुख्य मंत्री झाले तरी, सामान्यजवतेला, त्यांच्यांत आणि आपल्यांत अंतर निर्माण झाले आहे, असे कधी वाटले नाही. यशवंतरावांनीहि आपल्या वागणूकीनं तें वाटूं दिलं नाही. आपलं योग्य प्रतिनिधित्व करणारा नेता हीच भावना त्यामुळे जनतेंत कायम राहिली.

यशवंतराव मुख्य मंत्री झाले आणि त्यांच्यापासून महाराष्ट्रांतल्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या असल्या, तरी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतः यशवंतरावांना मात्र एकामागून क डोंगर चढून जाणं आवश्यक होतं. राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून त्याला ते विरोध करत होते. त्यामागे त्यांचा विशिष्ट हेतु होता. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिति भाषिक राज्य-रचनेच्या तत्वानुसार व्हावी ही तर त्यांची आकांक्षा होतीच, शिवाय संयुक्त महाराष्ट्र कशासाठी, याविषयीचे त्यांचे विचार निश्चित होते. १९३४ पासून समाजवादाचा विचार करणारं त्यांचं मन, समाजवादी संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पहात होतं.व्दैभाषिकाच्या निर्मितीनं संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा एक टप्पा ओलांडला गेला असला तरी देशी वसाहतवादाविरुद्धचा त्यांचा लढा संपलेला नव्हता. मुंबईचा समावेश महाराष्ट्रांतच झाला पाहिजे यासाठी ते निर्धारपूर्वक प्रयत्नशील होते.

व्दैभाषिक राज्य निर्मितीनं, मुंबईचं स्वतंत्र राज्य किंवा मुंबई ही केंद्रशासित रहावी यासाठी कारवाया करणारांचा पराभव झालेला असला, तरी गुजराती वर्गाच्या मनांतली पिळवणूक करण्याची वृत्ति संपलेली नव्हती, उलट महाराष्ट्रीय नेतृत्वाबद्दल अविश्वास व्यक्त करण्यापर्यंत त्यांची मजल पोंचली होती. यशवंतरावांना हें अवमानास्पद वाटणं स्वाभाविकच होतं. व्दैभषिकाच्या प्रत्यक्ष करभारानं, या राज्यात समाविष्ट झालेल्या सर्व विभागामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याचं आव्हान त्यामुळेच त्याच्यसमोर होतं. गुजराती समाजाच्या मनांत महाराष्ट्रीय जनतेबद्दल जिव्हाळा, आपुलकी निर्माण व्हायची तर मित्रत्ववर आणि प्रेमळपणावरच सर्व भर द्यावा लागणार होता. कोणत्याहि प्रकारची धमकीची किंवा दबावाची भाषा ही या दोन्ही जमातींत कायम स्वरुपाचा वैरभाव निर्माण होण्यातच कारणीभूत ठरणारी असल्यानं, तो धोका दृष्टिआड करतं येण्यासारखा नव्हता.

यशवंतरावांचं मूळ उद्दिष्ठ संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती हें असलं तरी श्रेष्ठ काँग्रेस नेत्यांनी पुढे केलेला व्दैभाषिकाचा पर्याय त्यांना विशिष्ठ परिस्थितींत मान्य करावा लागला होता. त्यामुळे व्दैभाषिक राबतांना संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योग्य असं वातावरण निर्माण करणं आणि त्याचबरोबर अंतिम उद्दीष्ट साध्य होण्यासाठी श्रेष्ठांच्या मनांत बदल धडवंणं सुलभ ठरेल, याच दृष्टिकोनातून पावलं टाकणं जरूर होतं. संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव यांच्याबरोबर राहून त्यांनी पूर्वी काम केलं, परंतु श्रेष्ठांकडून महाराष्ट्राचा निर्णय करून घेण्यात देव यांना यश आलं नव्हतं. अशा स्थितीत काँग्रेस जनांनी परिषदेबरोबर रहाण्यामधून कांही अनुकूल निष्पन्न होण्याची शक्यता उरली नव्हती. त्यामुळे काँग्रेस पक्षांन शिस्तीच्या चौकटीत राहूनच उद्दिष्टपूर्तीसाठी एकोप्यानं काम कराव या निर्णयापेरत आता यशवंतराव पोंचले.

तरी पण हें करीत असतांना त्यामध्ये सर्वांचा सहभाव त्यांना अपेक्षित होता. नवीन मुंबई राज्याचीं सूत्रं स्वीकारल्यापासून त्यांनी यासाठी जनतेकडे मागणं मागितलं. काय घडलं आणि काय घडवायचं आहे यासंबंधी यशवंतरावांचे विचार स्पष्ट होते. व्दैभाषिकाच्या उदघाटन प्रसंगीच त्यांनी तें व्यक्त केलं. भारतांत त्या काळांत अनेक पुनर्घटित राज्यं अस्तित्वात येत होतीं, तरी पण विशाल मुंबई राज्याला असामान्य महत्व प्राप्त झालेलं असल्यानं मुंबईसारखं भारतांतलं अग्रेसर राज्य, व्दैभाषिक राज्य या नात्यानं भारतापुढे कोणता आदर्श ठेवत आहे. याकडे सर्वांचं आस्थापूर्वक लक्ष लागलेलं आहे, याची जाणीव यशवंतरावांनी प्रथमपासून मनांत बाळगली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org