पंडितजींनी रूद्रावतार धारण करून वाकताडन केल्यानं सारा नूरच बदलला. प्रदेश-काँग्रेसच्या नेत्यांची तर गाळणच उडाली. राजभवनावर जें ठरलं होतं त्याच्या नेमकं उलट घडल्यानं सारेच निराश बनले. निदर्शनं पाहून नेहरूंचा संताप होतो हें काँग्रेस-जनांना माहीत होतं. त्यामुळे त्यांच्यासमोर निदर्शनं होऊं नयेत यासाठी पाटसकर वगैरेंनी खटपटहि केली होती. परंतु त्यांना अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. नेहरू रागांत बोलले, पण त्याचा परिणाम मात्र लोक अधिकच संतापण्यांत झाला.
या सभेनंतर परत जाणा-या काँग्रेस-नेत्यांच्या मोटारी अडविण्यास सुरूवात झाली. सभेंत गोंधळ, दगडफेक होऊन सभा उधळण्याचा प्रकार घडलाच होता. सभेनंतरहि तेंच वातावरण सर्वत्र पसरलं. के. . शहरा, रतिलाल संघवी, वाडिलाल पांचाळ आदींची मोटार चर्नीरोड स्टेशनजवळ अडवतांच, वाडिलाल पांचाळ यांनी गर्दीच्या रोखानं पिस्तूल झाडलं व त्यामध्ये सीताराम धाडीगावकर ठार झाला. त्यासरशी लोक खवळले आणि त्यांनी संघवी व पांचाळ यांना बाहेर ओढून मारहाण केली. स्वसंरक्षणार्थ पांचाळनं पिस्तूल झाडलं असं समर्थन नंतर मोरारजींनी केलं, पण या प्रकरणाची पोलिसांनी कांहीहि चौकशी केली नाही किंवा कुणाला अटक करून खटला दाखल केला नाही.
दुस-या दिवशीं काँग्रेस-अधिवेशनावर प्रचंड जमाव चालून गेला. मंडपावर बेसुमार दगडफेक झाली. कांही काँग्रेस-कार्यकर्ते व नेते जखमी झाले. त्या ठिकाणींहि जमाव हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला, अश्रुधूर, गोळीबार असे उपाय योजले. गोळीबारांत पन्नासांवर लोक जखमी झाले. समितीनं आयोजित केलेल्या सत्याग्रहानं आणि निर्दर्शनानं, मोरारजी देसाई व मुंबई प्रदेश-काँग्रेस यांचं सारं गणितच चुकीचं ठरलं. मुंबईंतील अधिवेशनाच्या निमित्तानं, वरिष्ठ काँग्रेस-नेत्यांनी मुंबईबद्दलचा केलेला निर्णय मुंबईच्या जनतेला सर्वसाधारणपणें मंजूर आहे याचा देखावा त्यांना पंतप्रधानांकडे उभा करायचा होता. ती त्यांची योजना व आशा निदर्शनांमुळे धुळीला मिळाली.
पंतप्रधानांना मुंबई शांत असल्याचं अनुभवास आलं असतं आणि तीच प्रतिमा मनांत ठेवून पं. नेहरू परतले असते, तर मुंबईतील जनतेच्या मनाला झालेली जखम आता भरून निघाली असून, ते आपल्या भवितव्याशीं आता मिळतं घेत आहेत असा त्यांचा समज झाला असता. समितीच्या नेत्यांना नेमकी हीच काळजी होती आणि त्यामुळे पं. नेहरूंच्या हळव्या मनाला त्यांनी धक्का दिला होता.
चौपाटीवरील सभेंत नेहरूंनी मुंबईबाबतचा निर्णय ठामपणानं सांगतांच महाराष्ट्रांतले काँग्रेस-नेते गोंधळून गेले. शिवाय सरकारचा निर्णय जाहीर करण्याच्या कामीं नेहरूंनी पक्षाच्या व्यासपीठाचा उपयोग केल्याबद्दल आणि सहका-यांना तो निर्णय अगोदर न सांगतां किंवा त्यांना विश्वासांत न घेतां तो जाहीर केल्याबद्दल लोकसभेचे सदस्यहि नाराज बनले. परिणामीं, पं. नेहरू दिल्लींत पोंचतांच सी. डी. देशमुख यांनी आपला राजीनामा मंजूर करावा यासाठी आग्रह धरला; परंतु नेहरूंनी पुन्हा त्यांना ‘थांबा’ म्हणून सांगितलं. नेहरू त्या वेळीं पांच आठवड्यांच्या परदेश दौ-यावर जाणार होते आणि राज्य पुनर्रचना विधेयक निर्वाचन समितीकडून परत येऊन लोकसभेसमोर दाखल व्हायचं होतं. हें सर्व होईपर्यत देशमुखांनी थांबावं असा त्यांचा सल्ला होता.
पं. नेहरूंच्या मुंबईंतील भाषणानंतर देवगीरीकर यांनी पंडीतजींना पत्र लिहीलं. मुंबईसंबंधीच्या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा विचार करून महाराष्ट्रींल वातावरण शांत होण्याच्या दृष्टीनं खुलासा करावा असं त्यांत सुचवलं होतं. परंतु पंडीतजींनी त्यांना पाठवलेल्या उत्तरांत पूर्वीचाच निर्णय त्यांनी कायम ठेवला आणि प्रदेश काँग्रेसच्या बैठकींच तोच वाचून दाखवा असं कळवलं.