इतिहासाचे एक पान. १०५

“साधनांचा विचारपूर्वक स्वीकार करावा, साध्य आपोआप मिळेल असं म. गांधींनीच सांगितलं आहे. महाराष्ट्राला मीं हें सांगितलं, पण वर्तमानपत्रांनी तें भडक स्वरूपांत प्रसिद्ध केलं आणइ अपप्रचाराला त्यांतून साधन मिळालं. साधेभोळे लोक मात्र त्यामुळे फसले. मी राजकारणांत आलों तो सेवेचा अधिकार घेऊन आलों आहे. लोकांना मी आवडलों नाही तर त्यांनी मला असेंब्लींत पाठवूं नये. पण माझ्या सेवेचा अधिकार कुणी काढून घेऊं शकणार नाही. मीहि कांही अगदीच पालापाचोळ्याचा नाही की कुणीं फुंकर मारून मी उडून जाईन! पंचवीस वर्षांचं माजं राजकीय जीवन जनतेपुढे आहे, मी त्याची जाहीर चौकशी करून घेण्यास तयार आहे. यशवंतराव राजकारणांतून सहजासहजीं उठून जाणार नाहीत. कृष्णाकाठच्या पाण्यावर आणि मातीवर मीहि वाढलों आहे. माझे कांही विचार आहेत. ज्यांनी या देशाला जीवन दिलं, मातींतून सोनं काढलं त्यांच्या धिक्काराच्या घोषणा या मरणप्रापय दु:ख देणा-या आहेत. मी गांधी-नेहरूंना मोठा म्हणतों म्हणून तक्रार आहे; त्यांना मोठं नको म्हणूं तर कुणाला म्हणूं? स्वातंत्र्यदिनाच्या दिवशईं ज्यांनी घरांवर काळीं निशाणं लावलीं त्यांना मोठं म्हणूं? कणकणानं राबून ज्यांनी देशाचं स्वातंत्र्य आणलं, या देशासाठी शेवटीं प्राणहि दिला त्यांना मी मोठं म्हणतों, यासाठी का मला सूर्याजी पिसाळ म्हणणार आहांत?

“मी सूर्याजी पिसाळ, तर या प्रश्नांतील शिवाजी आणि औरंगजेब कोण? आणि हा शिवाजी काय काळीं निशाणं घेऊन हिंडतो? मला मुद्दाम बदनाम करायचं असेल, तर तो उद्देश साध्य होईल कदाचित्, पण सत्य बदनाम होणार नाही. कोणत्याहि पक्षास मुंबई मिळवायची असेल, तर महाराष्ट्राबाहेरील आपल्या पक्षाच्या लोकांना मुंबईची मागणी न्याय्य कशी आहे, हें पटवून देऊनच ती मिळवतां येईल. लोकशाही राज्यकारभार जनतेच्या जवळ आणण्यासाठी एकभाषिक राज्याची चळवळ आपण चालू केली. त्यांतूनच संयुक्त महाराष्ट्राची मागणी केली. तशीच कानडी, गुजराती, हिदीं, तामीळ, मल्याळी अशींहि राज्यं मागितलीं. ही मागणी जेव्हा केली तेव्हाचं चित्र आणि आताचं चित्र हें समजून घेतलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा चार ठिकाणीं फाटलेला होता. मराठवाडा तुटक होता. मराठीचं माहेरघर, ज्ञानेश्वरीची पहिली ओवी गायली तो भाग, हैदराबाद संस्थानांत अडकून पडला होता. तिकडे नागपूर हिंदी भागांत होतं. मग उरला आपला बारा जिल्ह्यांचा महाराष्ट्र. हा सर्व विभाग एकत्र आणण्याचा आपला निश्चय होता. आम्हीं आमची त्याप्रमाणे मागणी मांडावयास सुरूवात केली. पूर्वीच्या दोन्ही कमिशनपेक्षा फाजलअल्ली कमिशनमुळे दोन-तीन गोष्टी निर्माण झाल्या.

“मराठवाडा महाराष्ट्र राज्यांत यावा हें राज्य-पुनर्रचना कमिशननं मान्य केलं; पण त्याचबरोबर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हें महाराष्ट्रावरील संकट ठरलं. या योजनेविरूद्ध महाराष्ट्र-काँग्रेसनं आवाज उठवला. विदर्भाचं स्वतंत्र राज्य हा अन्याय असल्याचं मत नेत्यांनी मान्य केलं. महाराष्ट्र-काँग्रेसनं हें नाकारलं म्हणून राज्य-पुनर्रचना कमिशनचं द्वैभाषिक गेलं. आठ जिल्ह्यांचा विदर्भ, गेलीं तीन शतकं त्यांनी स्वतंत्र राज्याची भावना निर्माण केली होती. आणि आम्हींच खुद्द अकोला-करारानं विदर्भाचं छोटं राज्य तत्त्वत: मान्य केलं होतं. तरी पण एकभाषी राज्याकरिता विदर्भाला मिळालेलं राज्य काढून घेतलं गेलं आणि तो भाग महाराष्ट्रांत आला. आता राहिलीं दोन दु:खं! एक मुंबईचा प्रश्न आणि महाराष्ट्राची दक्षिण सरहद्द- सीमा प्रश्न. मुंबई महाराष्ट्राला मिळाली नाही म्हणून प्रत्येक मराठी माणसाला दु:ख आहे. त्या दु:खांत मीहि सहभागी आहे. मुंबईचा माझा हट्ट मी नेहरूंच्या जवळून सोंडणार नाही. सामान्य माणासाच्या डोळ्यांत आज नुकतंच कुठे तेज आलं आहे; राष्ट्रीय शक्तीशीं समरस होऊन चालण्याचा ते प्रयत्न करत आहेत; पण त्यांना आंदोलनाच्या मार्गावर ओढलं जात आहे. तुम्ही फसत आहांत अशी त्यांना माझी धोक्याची सूचना आहे. मागणी पूर्ण होण्यासाठी मार्गाचा आणि पद्धतीचा हा विरोद आहे. आज या प्रश्नावर गावा-गावांत जें विष पेरलं जात आहे त्याच्या परिणामाचा विचार करा. देशाचे इतर प्रश्न ज्या मार्गांनी काँग्रेसनं सोडवले त्याच मार्गानं-पद्धतीनं हाहि प्रश्न सोडवला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राची प्रेरणा ही रानडे, गोखले, टिळक यांची प्रेरणा आहे. अखिल भारतीय काँग्रेसला जन्माला घालण्यास ज्यांचा हातभार लागला त्यांच्या मनांत सर्व देशाचं भलं होण्याबरोबरच महाराष्ट्राचंहि भलं होईल, हा विचार होता. कोणताहि संयुक्त महाराष्ट्राचा खरा प्रेमी हा प्रथम भारतीयच आहे.”

यशवंतरावांच्या या भूमिकेला सातारा जिल्ह्यांतील काँग्रेस-कार्यकर्त्यांनीहि साथ दिली. यशवंतरावांनी त्या काळांत महाराष्ट्रांत दौरे करणं हें मोठंच धाडसाचं होतं. परंतु ‘शहाणे करून सोडावे सकळजन’ याचं जणू त्यांनी व्रतच घेतलं होतं. त्यांनी हें व्रत त्या वेळीं स्वीकारलं तेंच ठीक झालं असं इतिहास सांगतो. कारण देव आणइ हिरे यांच्या बोलण्यांत आणि कृतींत कांही मेळ राहिला नव्हता. हिरे हे इतके गोंधलेल होते की, ते दिल्लींत एक बोलत आणि महाराष्ट्रांतील सहका-यांना वेगळंच कांही सांगत असत. चव्हाणांचं नेतृत्व महाराष्ट्रांत मूळ धरूं लागलं आहे हें त्यांच्या मनांतलं एक दुखणं असावं असं दिसतं. कारण ते त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असत. चव्हाणांनी त्यांना या संबंधांत एकदा प्रेमानं जाणीवहि दिली. हिरे हे जाहीर भाषणामध्ये प्रसंगीं लोकांना दोष देणारे शबेद उच्चारत असत, तर दुस-या बाजूला चव्हाण हे विरोधकांचे शिव्याशाप चालू असतांनाहि लोकांना विस्वासांत घेऊन जाहीरपणएं त्यांच्याशीं संवाद करत राहिले होते. यशवंतरावांची सांगलींतील सभा हें त्याचंच द्योतक होतं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org