इतिहासाचे एक पान.. १

याचें एक उदाहरणच देतों. यशवंतराव हे द्वैभाषिकाचे मुख्य मंत्री होते. मी विधानसभेचा सभासद होतों. विधानसभा चालू असतांनाच केसरीच्या दिल्लीच्या वार्ताहरांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र प्रस्थापनेची पंडितजींची घोषणा मला मुंबईस ताबडतोब कळविली. त्याबद्द आनंद व्यक्त करणारी चिठ्ठी ट्रेझरी बेंचवर मुख्य मंत्र्यांच्या जागीं बसलेल्या यशवंतरावांकडे मी पाठविली व त्यांतच विनंती केली, या आनंदाच्या घोषणेच्या वेळी, गांधीहत्त्या-प्रकरणीं जाळपोळ झालेल्यांना पुनर्वसनासाठी जी कर्जे दिलीं आहेत तीं माफ करावी. यशवंतरावांनी ती सूचना लगेच उचलून धरली आणि संयुक्त महाराष्ट्राचे एक नवें पर्व जुनी जळमटें झटकून सुरू केलें. अनेक सार्वजनिक संस्थांना त्यांचा आधार मिळाला. केवळ प्रगत समाजासच नव्हे, तर नवबौद्धांनाहि अनेक सोयीसवलती आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत उपलब्ध करून देऊन त्यांच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

अँग्रो-इंडस्ट्रीजची घोषणा करून बहुजन-समाजाच्या संपत्तींत तर त्यांनी भर घातलीच, पण पर्यायाने त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक विकासास मोठी गति दिली. सहकारी क्षेत्रास त्यांनी दिलेल्या उठावामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या किती तरी भागाचें आज नंदनवन झालेलें दिसतें. प्रगतिशील शेतकरी, सहकार-महर्षि, साखर-कारखानदार या सा-या नामाभिधानांचे श्रेय केवळ यशवंतरावांच्या दूरदृष्टींत आहे. यशवंतराव हे एकच असे नेते असतील की, सा-या जाति-जमातींचे लोक त्यांना मानत – त्यांच्याबद्दल प्रेम बाळगतात.

कै. तात्यासाहेब केळकर यांनी एका व्याख्यानांत सांगितल्याप्रमाणे कीर्ति ही समुद्राच्या लाटांसारखी आहे. एका लाटेंतून दुसरी उठते, दुसरींतून तिसरी उठते व पसरत जाते. महाराष्ट्रांत यशवंतरावांच्या कर्तृत्वाची उठलेली लाट पुढे हळूहळू देशांत पसरत गेली. पण या सा-या राजकीय जीवनांत एक सुसंगतपणा कायम राहिला. शक्ति-युक्तीचा वापर लोकहितासाठी करण्याचें ध्येय कायम राहिलें. पुरोगामित्वाच्या आकर्षणापायी लोकसंग्रह सुटला नाही. राजकारण आणि टीकी जुळ्या बहिणी होत. निंदकाचे घर राजकीय नेत्याच्या पाठीशीं असतें. यशवंतरावहि त्यांतून मुक्त नाहीत. परंतु स्थिर व सम्यकबुद्धीचा माणूस शेवटी हेंच म्हणेल की, या नेत्याने आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र-समाजास एकात्म व प्रगत बनविण्याचा सतत प्रयत्न केला. त्यांची ही देणगी इतिहासाच्या सोनेरी पानावर नोंदली गेली आहे.

यासाठीच मित्रवर्य श्री. रामभाऊ जोशी यांचा हा ग्रंथ आम्ही महाराष्ट्रांतील भावी पिढीसाठी प्रसिद्ध करीत आहों.

- ज. श्री. टिळक
पुणें
दि. ३१ मे १९७६

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org