कृष्णा-कोयनेच्या पवित्र संगमावरील
स्व. यशवंतराव चव्हाण समाधी व परिसर

कृष्णा-कोयना प्रीतिसंगमावर वसलेले कर्‍हाड शहर हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे. दक्षिणवाहिनी कृष्णा आणि उत्तरवाहिनी कोयना या समोरासमोर एकमेकीस मोठया भक्तिभावाने भेटतात आणि या प्रीतिसंगमानंतरची कृष्णा पूर्ववाहिनी होते. आणि या कृष्णा - कोयनेच्या संगमामुळे होणार्‍या काटकोनात वसलेले दोन नद्यांच्या काठचे गाव म्हणजे कर्‍हाड. हे फार प्राचीन असे गाव असून त्याला तसा इतिहासही आहे. त्यामुळेच कर्‍हाडला प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

संगमाला लागूनच पुरातन भुईकोट किल्ला आहे. किल्ल्याच्या पाणदरवाजातून निघालेला एक घाट संगमावरील नदीच्या पात्रातील संगमेश्वराच्या मंदिरापर्यंत जातो. किल्ल्याचा तट आणि नदीचे पात्र यांच्यामध्ये ३०० फूट रुंदीचे व पूर्व - पश्चिम ८०० फूट लांबीचे एक विस्तीर्ण सपाट मैदान आहे. त्याच्या पूर्वेस प्रशस्त कृष्णा घाट आहे. आणि त्याला लागूनच पश्चिमाभिमुखी कृष्णाबाई मंदिर आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत स्व. जवाहरलाल नेहरू, काकासाहेब गाडगीळ आदी अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या विराट सभा या बागेत झाल्या आहेत. तसेच स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक राजकीय चळवळीचे कृष्णा घाट हे प्रमुख ठिकाण मानण्यात येते. या एकूण परिसराला कर्‍हाडच्या जीवनात पूर्वापार पवित्र्याचे स्थान लाभलेले आहे. संगमापासून पूर्वेस एक मैलभर विस्तीर्ण वाळवंट पसरलेले आहे. सुमारे ३५-४० वर्षांपूर्वीपर्यंत या परिसरात कर्‍हाडकरांची वर्दळ मोठया प्रमाणावर असे. प्रीतिसंगम आणि त्याच्या आसपासच्या परिसराबद्दल सर्वच कर्‍हाडकरांना आत्मीयता व जिव्हाळा आहे.

कृष्णा नदी ही भारताच्या प्राचीनतम संस्कृतीचे व जीवनप्रवाहाचे प्रतीक आहे. हा जीवनप्रवाह बदलत राहतो. त्याचे प्रतीक मात्र कृष्णाच राहते. याच प्रदेशात यशवंतरावांचे जीवन घडले. जात्याच त्यांना निसर्गाची ओढ अधिक होती नदीच्या संगमावर काठावर बसावं आणि एकमेकांत मिसळून जाणारं आणि पुढे एकोप्यानं संथ गतीनं चाललेलं 'जीवन' पहावं असा एक छंद त्यांनी जोपासला होता. तरुण वयात असताना कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्याचं यशवंतरावांचं ठिकाण म्हणजे हा संगम. माणसाचे छंद, त्याच्या स्वभावाचे निदर्शक असतात असे म्हटले जाते. या विचारांचा, संस्कारांचा, साहचर्याचा मागोवा घेत घेत यशवंतरावांनी आपले कर्तृत्व केले. या स्थानाबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता आणि म्हणूनच ते आपल्या 'ॠणानुबंध' या १९७० मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत म्हणतात, 'कृष्णा व कोयना या दोन नद्यांच्या काठावर नांदणारे माझे गाव कर्‍हाड यास....'

''तुझ्यापासून वर्षानुवर्षे दूर राहिलो, पण तुझी ओढ नित्य वाढतच राहिली. कोयनेच्या काठी राहिलो, खेळलो., तर कृष्णेच्या काठी शिकलो - वाढलो. दोन्ही नद्यांच्या पाण्यात डुंबलो. याच पाण्याने काही छंद लावले व काही श्रद्धा दिल्या.” त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या आत्मचरित्राच्या पहिल्या खंडास 'कृष्णाकांठ' असे सार्थ शीर्षक दिलेले आहे. कर्‍हाडचे नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांना १६ मे १९६१ ला, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मुंबईहून पत्र लिहून कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमाचा कायापालट घडावा यासाठी काय करावे हे त्या पत्रात त्यांनी लिहिले आहे-

''कर्‍हाडचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण प्रीतिसंगम. मराठी साहित्यात व इतिहासातही ते अजरामर झाले आहे., परंतु प्रीतिसंगम आज पाहण्यासाठी येणार्‍याला तेथील सर्व वातावरण अव्यस्थेचे, अस्वच्छ व उपेक्षितांचे असे वाटते. तेथपर्यंत जाताना वाटते, रस्त्यावर आणि वाळवंटात अगदीच ओबड-धोबड परिस्थिती आहे. घाटाच्या समोर खड्डे व इतर ढीग पडलेले असतात. ही सर्व परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. स्वामीच्या बागेची जागा ताब्यात घेऊन तेथे एक सुंदर संगम उद्यान बनविणे शक्य आहे. भुईकोट कोल्ल्याच्या, संगमाशेजारील तटावर दुरुस्ती करून संगमाचे, पावसाळ्यातील अलौकिक स्वरूप पाहण्यासाठी आकर्षण व्यवस्था करणे जरूर आहे. या भागात कोयनेमुळे हल्ली देशी व परदेशी प्रवासी लोकांची संख्या वाढू लागली आहे. त्या सर्व लोकांच्या भेटीचे प्रीतिसंगम हे एक महत्त्वाचे केंद्र बनू शकेल. टुरिझम या खात्याच्या मदतीने हा प्रयत्‍न करून पाहण्यासारखा आहे. आपण व्यक्तिश: प्रयत्‍न करून नगरपालिकेचे या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधावे म्हणून मी हे पत्र या शहराचा एक नागरिक या नात्याने लिहीत आहे. प्रयत्‍न सुरू केल्यास राज्याचे स्थानिक व वरिष्ठ अधिकारीही या प्रश्नांत लक्ष  घालतील याबद्दल मला मुळीच शंका नाही. पत्र काहीसे लांबले., परंतु मनात असलेले कल्पनांचे ओझे आज हलके झाल्याचे समाधान मला मिळत आहे.''