“यशवंतराव : राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व” संपा. भा. कृ. केळकर या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ग्रंथात “राजकीय जीवनाचे चार अध्याय” या आपल्या लेखात संसदपटू श्री. मधु लिमये म्हणतात, ''यशवंतरावांना नाटय व साहित्य यात रस होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकरंगी होते. त्यांचे आत्मचरित्र अपुरे राहिले याची खंत वाटते. त्याचा पुढील भाग मनाने राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर जर त्यांनी लिहिला असता तर तो निश्चितच रंगतदार झाला असता, यात शंका नाही'' (यशवंतराव : राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व - पृष्ठ -१००)
यशवंतरावजी हयात असताना त्यांच्या व त्यांच्याविषयी केल्या गेलेल्या लेखन-साहित्याचा संग्रह मी साहेबांच्यावरील एक निष्ठेचाच भाग म्हणून केला आहे. त्यासाठी मी माझा ग्रंथपालाचा व्यवसाय सांभाळून जितका वेळ देता येईल तितका वेळ दिला. प्रसंगी शरीरप्रकृती आणि आर्थिक अडचणी याकडे दुर्लक्षही करावे लागले, तरी यशवंतरावांनी व्यक्तिगत माझ्यासाठी व महाराष्ट्रासाठी जे सर्वांगीण कार्य केले आहे, त्याची अंशत: परतफेड म्हणून मी हे केले. यासाठी क्वचित उपेक्षा व मानहानीही सहन करावी लागली. तरीही मी हे कार्य चिकाटीने चालूच ठेवले आहे.
२५ नोव्हेंबर १९८४ रोजी माझ्या या श्रद्धास्थानाचा पार्थिव देह काळाने हिरावून घेतला. तरीही त्यांच्या कार्याची स्मृती माझ्या अंत:करणावर कोरलेलीच राहिली. यशवंतरावांचा हा भावनिक व मानसिक सहवास माझ्यापासून कोणीच हिरावून घेणार नाही. कारण आता जेव्हा मला साहेबांची आठवण होते तेव्हा माझ्याजवळील वरील विचारधन मला वेळोवेळी आधार देते. यशवंतरावांच्या निधनानंतरही माझे हे कार्य अव्याहतपणे चालूच आहे. त्यानंतरच्या काळात त्यांच्यावर प्रकाशित झालेल्या लेखनांचाही संग्रह मी करीत राहिलो. त्यासाठी वर्ष - दीड वर्ष भंडारा - चांद्यापासून बेळगांव - बांद्यापर्यंत मी वणवण भटकलो व त्यासाठी माझे स्वत:ची सुमारे पंचेचाळीस हजार इतकी रक्कम खर्च झाली. हे सर्व मी आत्मप्रौढीने सांगत नाही. मात्र हे सर्व करताना मला ज्या असंख्य ज्ञात - अज्ञात व्यक्तींचे सहकार्य झाले - त्यात यशवंतरावांच्या अगदी निकटचे म्हणून मिरविणार्या राजकीय व सहकारी क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्तींचे सहकार्य मात्र झाले नाही. उलट त्यांच्याकडून उपेक्षाच झाली. इतर सर्व क्षेत्रातील सर्वसामान्य व्यक्तींनी तसेच नामवंत अभ्यासकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी माझ्या अथक प्रयत्नांची दखल घेऊन प्रसंगी मला सर्व प्रकारचे सहकार्य दिले. यातही नोंद करण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे यशवंतरावांच्या फारशा जवळ नसलेल्या उद्योगपतींचे, संपादकांचे व संस्थांचेही सहकार्य मला अनपेक्षितपणे मिळाले व यशवंतरावांचा एक नवाच पैलू यानिमित्ताने मला उगमला. तो म्हणजे यशवंतराव हयात असताना तात्त्विक भूमिकेवरून त्यांना उघड विरोध करणार्या व्यक्ती आणि संस्था, त्यांच्या निधनानंतर त्यांचे योगदान समजू शकल्या., पण ज्यांचा मोठेपणा यशवंतरावांनी जन्मभर सांभाळला, त्याच व्यक्ती मात्र यशवंतराव जाताच त्यांच्या विचारधनाचे व कार्याचे महत्त्व विसरल्या. 'छोटया माणसांना सुद्धा मोठे करण्याचे कार्य यशवंतरावांनी केले.' हा तो पैलू होय.
मी संग्रहित केलेल्या यशवंत साहित्याचा तरुणपिढीला अभ्यास व संशोधन करण्यासाठी उपयोग होत आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या संग्रहित साहित्याच्या आधारे आतापर्यंत चार अभ्यासकांनी एम्. फील. व चार संशोधकांनी पीएच्. डी ही पदवी संपादन केली आहे. आणि सध्या चार संशोधक एम्. फील व पीएच्. डी. साठी या साहित्याचा उपयोग करीत आहेत. एवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष संशोधनाशी संबंध नसलेले परंतु यशवंतरावांच्या विचारधनासंबंधी आस्था असणारे असे महाराष्ट्रातील व परप्रांतीय कितीतरी यशवंतप्रेमी यासंदर्भात मला भेटतात, त्यांना माझे नेहमीच सहकार्य असते. या अखंड साधनेला प्रमुख प्रेरणा साहेबांची असल्यामुळे माझा हा ग्रंथ मी त्यांच्या स्मृतीसच अर्पण करीत आहे. त्यांच्या ॠणातून मी कधीही मुक्त होऊ शकणार नाही.