कोणताही नेता व्यापक व्यासंगाशिवाय आजच्या गतिमान जगात काम करू शकणार नाही आणि खरे नेतृत्व असा व्यासंग सहजपणे सातत्याने करीत असते. त्यांच्या खुणा त्या काळापासूनच यशवंतरावांच्या आयुष्यात दिसतात. मार्क्सवाद, रॉयवाद, समाजवाद, नियोजन यांचे परिशीलन आणि सखोल चिंतन त्यांनी सतत केलेले होते आणि त्यातूनच आपल्या राजकीय कार्याची दिशा आणि विकास कार्यक्रमाचे अग्रक्रम त्यांनी ठरवायला सुरूवात केलेली दिसून येते. जनसामान्यांचे कल्याण, हितसंबधीयांना शह, सर्वास योग्य संधी आणि दलित गरीब जनतेची शोषणापासून मुक्ती ही ध्येये स्वातंत्र्यपूर्वकाळापासूनच त्यांनी पुरस्कारलेली दिसतात.

सुरूवातीच्या काळापासूनच यशवंतराव चिंतनशील स्वभावाचे असल्याने त्यांनी विविध ग्रंथांचे वाचन, बहुश्रुतपणा, वक्तृत्व आणि सांस्कृतिक जाणीव जोपासल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक शालीनता, ॠजुता, शब्दांचे भाषाभान या बर्‍याच राजकीय नेत्यात अभावाने आढळणार्‍या गुणांचा विकास झालेला दिसून येतो. त्यामुळेच लोकसभेत जेव्हा यशवंतराव विरोधी पक्षावरही घणाघाती टीका करीत तेव्हाही शालीनतेचा तोल कधीही सुटत नसे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी आचार्य अत्रे यांच्या 'मराठा' दैनिकातून त्यांच्यावर होणार्‍या अत्यंत ओंगळ आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या टीकेच्या भडिमाराला त्यांनी पातळी न सोडता पण घणाघाती उत्तर दिले, ते त्या या शालीन टीका पद्धतीचे एक ठळक उदाहरण देता येईल

१९३० ते १९४५ या काळात जे नेतृत्व निर्माण होत होते त्यांना केवळ स्वातंत्र्यच मिळवायचे नव्हते. कारण ते तर दृष्टिपथातही आले होते. म. गांधींनी अनेक प्रशासक, डॉक्टर्स, वैज्ञानिक, तंत्रज्ञ इत्यादींना तुम्ही तुमच्या क्षेत्रातच कार्य करा, उद्याचा भारत तुम्हाला घडवायचा आहे, असे सांगितले होते. पक्षातील सजग नेतृत्वाने आपल्यापुढे कोणती कामे आहेत याचा मागोवा त्याच वेळी घेतला होता. यशवंतरावांनी ग्रामीण भागातील सरंजामशाही दूर करण्यासाठी, शेतकर्‍यांची अवकळा नाहीशी करण्यासाठी काम केले पाहिजे याची आणि शिक्षणाच्या, आरोग्य विकासाच्या कोणत्या वाटा चोखाळल्या पाहिजेत याची खूणगाठ त्याचवेळी बांधली होती. जातीय वैमनस्यास तिलांजली देणे आणि विकासाची रचना सामाजिक न्यायावर आधारणे ही आपल्या कार्याची दिशा त्यांनी अभ्यासपूर्वक स्वातंत्र्यपूर्व काळातच नक्की केल्याचे दिसून येते. त्यासाठी त्यांनी वाचन, ग्रामीण भागात सर्वदूर निरीक्षण याचा अवलंब केलेला आढळतो. गावोगाव हिंडून गांधींच्या चळवळीचा प्रचार करताना, कार्यकर्त्यांशी हितगूज करताना त्यांनी देशाचे अर्थकारण, समाजकारण उघडया डोळयांनी पाहिले आणि प्रचीतीचे बोलणे या स्वरुपात ते लोकापुढे मांडले आणि म्हणूनच जेव्हा १९४६च्या निवडणुकीत ते निवडून आले तेव्हा त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची आणि महाराष्ट्राला नेतृत्व देण्याची तयारी जवळ जवळ पूर्ण झाली होती. आता फक्त कृती आणि कृती करता करता नेतृत्वाची उमेदवारी.

यशवंतरावांचे नेतृत्व ज्या काळात विकसित होत होते, त्या काळानेच त्यांना अनुभव आणि व्यासंग यांचे महत्त्व पटवून दिले होते. सत्ता सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी आहे आणि सेवा करण्यासाठी समस्यांची आणि संयोजनाची माहिती आवश्यक आहे, हा विचार त्या काळातील नेत्यास पटवून द्यावा लागत नसे. आणि म्हणूनच मोरारजी देसाई यांचे सारख्या, बाळासाहेब खेर यांच्यासारख्या नेत्यांकडून यशवंतरावांनी हंसाच्या निरक्षीरबुद्धीने राजकारणाचे बारकावे, कार्यक्षमता, कामाचा उरक, दीर्घ दृष्टी आणि निर्णय घेण्याची तत्परता, अंमलबजावणी, धडाडी यांचा स्वीकार केला. ही 'धीर धरी रे धीरापोटी' धीरगंभीरवृत्ती त्यांना स्वातंत्र्यपूर्व काळातील चिंतनशील व्यासंगापासूनच लाभलेली आहे, असे दिसून येते. त्यामुळेच यशवंतरावांचे नेतृत्व संयुक्त महाराष्ट्राच्या अग्निदिव्यातून अधिक ऊर्जस्वल बनले असे दिसून येते.

राजकारण करत असताना राजकारणाच्या चढ-उतारामध्ये सामाजिक सुधारणेचा परिवर्तनाचा धागा त्यांनी आपल्या हातून कधीही सोडला नाही. महाराष्ट्राच्या परिवर्तनाचे ते शिल्पकार ठरले.

राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवादी दृष्टिकोन या त्रिसूत्रीमध्ये काँग्रेस संस्कृती समाविष्ट आहे. तर कोणताही निर्णय लोकांच्या मताने घेणे हा या संस्कृतीचा आधार आहे.

सामान्य शेतकर्‍याच्या घरातील हा मुलगा अठराविश्वे दारिद्रयाला तोंड देत असतानाही उच्चविद्याविभूषित होतो हीच एक मोठी किमया आहे. त्यासाठी जिद्द दाखवून हा गरीब मुलगा एकीकडे ऐरणीवरील घाव सोशीत तावून सुलाखून निघत असताना राष्ट्रीय आंदोलनात स्वत:साठी एक स्थान संपादन करतो, ही तर अधिकच कौतुकास्पद घटना होय.