न्या.पी.बी.सावंत

न्या.पी.बी.सावंत

यशवंतराव चव्हाण एक आदर्श मुख्यमंत्री
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष. अनेक चौकशी आयोगांचे अध्यक्ष म्हणून कार्य.
आजही कार्यक्षमपणे अनेक पदांवर कार्यरत. निःस्पृह व निःपक्षपातीपणे कार्य.

यशवंतरावांच्या दूरदृष्टीला त्यांची सुसंस्कृतता, समन्वयवादी भूमिका व मूल्याधिष्ठित कारभार शैली यांची सुयोग्य जोड मिळाली. म्हणूनच त्यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द आजवरच्या सर्व कारकिर्दीत उठून दिसते. नव्हे ती आदर्शवत आहे.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यावेळच्या मुंबई इलाख्याचे सर्वश्री बी. जी. खेर व मोरारजी देसाई यानंतरचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून श्री यशवंतराव चव्हाण यांची काँग्रेस पक्षातर्फे निवड झाली व महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात एक नवे पान उलटले गेले. महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देण्याच्या या कार्याला श्री मोरारजी देसाई यांनी अप्रत्यक्षपणे हातभार लावल्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत, "सर्वानुमते जर मी मुख्यमंत्री राहणार असेन तरच मुख्यमंत्रिपद स्वीकारेन" अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली नसती, तर महाराष्ट्राचा तो भाग्यदिन उजाडला नसता. त्यावेळच्या सर्व मुख्यमंत्र्यांत यशवंतराव हे वयाने लहान होते व म्हणूनच श्री के.एम. मुनशी यांनी त्यांना बेबी (इरलू) चीफ मिनिस्टर म्हणून संबोधिले होते. यशवंतराव केवळ वयाने लहान नव्हते तर शेतकरी कुटुंबातील व ग्रामीण भागातून आलेले ते पहिलेच मुख्यमंत्री होते. मंत्रालयातील अभिजन नोकरशाही काहीशा साशंकतेनेच या अभिनव प्रयोगाकडे पहात होती. आपल्या चोखंदळ, स्वच्छ, कार्यक्षम, सृजनशील व लोकाभिमुख कारभाराने यशवंतरावांनी सर्वांनाच अवाक् करून टाकले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व ग्रामीण भागाची मान त्यामुळे उंचावली बहुजन समाजाची छाती फुगली. त्यांचा आत्मविश्वास वाढला.

यशवंतरावांच्या कारकिर्दीत भारतात प्रथमत:च राजकीय सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा प्रयोग महाराष्ट्रात करण्यात आला. जिल्हा परिषदा व तालुका पंचायत समित्या या राज्यात प्रथमत: निर्माण झाल्या व त्यानंतर त्यांचा प्रसार देशाट इतरत्र झाला. अर्थव्यवस्थेची मोठ्या प्रमाणात सहकारी पायावर उभारणी, याचे श्रेयही त्यांच्याच कारकिर्दीला द्यावे लागेल. या दोन उपायांमुळे राजकीय सत्तेचे व आर्थिक सत्तेचे जे विकेंद्रीकरण झाले. त्यामुळे ग्रामीण भागातून नेतृत्व उभे राहिले व तोवर दबली व दडपली गेलेली ग्रामीण जनता खडबडून जागी झाली. ग्रामीण भागाला केवळ आवाजच नाही तर पंखही फुटले. महाराष्ट्राच्या सृजनशीलतेला पूर आला.

यशवंतराव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असताना राज्याच्या शासनाची स्वच्छ, कार्यतत्पर व शिस्तप्रिय प्रतिमा कायम राहिली. एवढेच नव्हे तर तिला लोकाभिमुख कारभाराची जोड मिळाल्यामुळे तिला अधिकच उजाळा मिळाला, यशवंतरावांच्या दूरदृष्टीला त्यांची सुसंस्कृतता, समन्वयवादी भूमिका व मूल्याधिष्ठित कारभारशैली यांची सुयोग्य जोड मिळाली. म्हणूनच त्यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द आजवरच्या सर्व कारकिर्दीत उठून दिसते. नव्हे ती आदर्शवत आहे. केंद्रात त्यांनी भूषविलेले मंत्रिपद व इतर पदांच्या कारभारात नाव ठेवण्यासारखे विरोधकांनाही काही सापडले नाही.

यशवंतरावांनी आपल्या चौरस व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राचे व बहुजन समाजाचे नांव मोठे केले. महाराष्ट्र त्यांच्याकडे एक आदर्श राजकीय नेता, विवेकी, विचारी, व्यासंगी व सुसंस्कृत समाजपुरुष व खाजगी व सार्वजनिक आयुष्यात मूल्याधिष्ठित जीवन जगणारी लोकप्रिय व्यक्ती म्हणून ओळखतो व ओळखत राहणार आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com